इराणनं अमेरिकेचे आकाशातले 'कान-डोळे' फोडले! ६००० कोटींच्या विमानाचा केला कोळसा, सौदीतील तळावर मोठा हल्ला

Foto
रियाध: अमेरिका आणि इस्रायलनं युद्ध पुकारल्यानंतर इराणने कडवा प्रतिकार सुरू केला आहे. अमेरिका आणि इस्रायलवर इराणने प्रतिहल्ले सुरुच ठेवले आहेत. इराणच्या आक्रमकतेमुळे अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांची डोकेदुखी वाढली आहे. अशातच अमेरिकन लष्करी तळावर इराणने केलेल्या हल्ल्यानं अमेरिका चांगलीच हादरली आहे. सौदी अरेबियातील अमेरिकन तळावर केलेल्या हल्ल्यानं अमेरिकेच्या युद्ध मोहिमेला झटका बसला आहे.

पश्चिम आशियातील युद्ध आता एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचले आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेला सर्वात मोठा लष्करी धक्का बसला आहे. सौदी अरेबियातील 'प्रिन्स सुल्तान एअरबेस'वर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात अमेरिकन हवाई दलाचे अत्यंत महत्त्वाचे Boeing E-3 Sentry (AWACS) हे पाळत ठेवणारे विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने या संदर्भात खळबळजनक वृत्त दिले असून, या एका विमानाची किंमत आणि त्याचे महत्त्व पाहता अमेरिकेचे अब्जावधींचे नुकसान झाले आहे.

अमेरिकेच्या मोहिमेत महत्त्वाचे का होते विमान?

E-3 Sentry हे केवळ एक विमान नसून ते आकाशातील एक फिरते 'रडार स्टेशन' आहे. शेकडो किलोमीटर दूरवरून येणारी शत्रूची क्षेपणास्त्रे आणि विमाने टिपण्याची क्षमता यात आहे. रणांगणाची रिअल-टाइम माहिती देणारे हे विमान 'AWACS' यंत्रणेने सज्ज होते. एक प्रकारे हे विमान अमेरिकेसाठी आकाशातील कान-डोळे होते. आता हे कान-डोळे इराणने फोडून काढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकेकडे अशा प्रकारची केवळ १६ विमाने सुस्थितीत उरली होती, त्यापैकी एक आता इराणने मातीमोल केले आहे.

इराणच्या हल्ल्यात १२ अमेरिकन सैनिक जखमी
शुक्रवारी झालेल्या या भीषण हल्ल्यात केवळ विमानाचेच नुकसान झाले नाही, तर १२ अमेरिकन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच इंधन भरणाऱ्या  अनेक विमानांनाही मोठी क्षति पोहोचली आहे. या विमानाचा पर्याय म्हणून पाहिले जाणारे E-7 Wedgetail हे विमान खरेदी करायचे झाल्यास अमेरिकेला एका विमानासाठी तब्बल ७०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ५,८०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. या हल्ल्यामुळे अमेरिकेची मध्यपूर्वेतील हवाई सुरक्षा यंत्रणा खिळखिळी झाली असून, इराणच्या या धाडसाने पेंटागनमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.